अभिनेते भाऊ कदम, विशाखा सुभेदार यांच्या नाटकांसह द फोक मराठी, लाईव्ह ऑर्केस्ट्रा, मॅरेथॉन व विविध स्पर्धांचे आयोजन
ईश्वरपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव २०२६ निमित्त विविध दर्जेदार सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चला हवा येऊ द्या फेम सिनेअभिनेते भाऊ कदम यांचे ‘पहिली लग्नाची, दुसरी प्रेमाची’, तसेच विशाखा सुभेदार यांचे ‘द दमयंती दामले’ ही नाटके, पारंपरिक लोकसंगीत व लोककलेचा वारसा पुढे नेणारा ‘द फोक मराठी’, नामवंत वक्त्यांची व्याख्याने, राजारामबापू मॅरेथॉन, रस्सीखेच, गौरी-गणपती गृहसजावट, रांगोळी स्पर्धा, लाईव्ह ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या सांस्कृतिक मेजवानीचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी केले आहे. आज, सोमवारी सकाळी १० वाजता कारखान्याच्या चारही युनिटमध्ये श्री गणेशाची आगमन व प्रतिष्ठापना होणार आहे. साखराळे युनिटमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी रात्री ह.भ.प. दिगंबर यादव, बावची यांचे सुश्राव्य कीर्तन होईल. मंगळवारी (दि. १५) दुपारी ३ वाजता प्रसिद्ध वक्ते वसंतराव हंकारे यांचे ‘चला, जगूया आनंदाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवारी (दि. १६) रात्री ८ वाजता भाऊ कदम अभिनित ‘पहिली लग्नाची, दुसरी प्रेमाची’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
गुरुवारी (दि. १७) सकाळी ८ वाजता वाळवा पंचायत समितीपासून ‘राजारामबापू मॅरेथॉन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले असून, त्यानंतर दुपारी १ वाजता रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. शुक्रवारी (दि. १८) महिलांसाठी गौरी-गणपती गृहसजावट स्पर्धा, तसेच दुपारी २ वाजता ‘कामगार कलाविष्कार’ कार्यक्रम होईल. शनिवारी (दि. १९) रात्री ‘द फोक मराठी’ हा लोककला व लोकसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
सोमवारी (दि. २१) महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार असून, मंगळवारी (दि. २२) ‘मी होणार सुपर स्टार’ फेम शुभम सातपुते यांच्या सदाबहार हिंदी-मराठी गीतांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा रंगणार आहे. बुधवारी (दि. २३) रात्री विशाखा सुभेदार यांचे ‘द दमयंती दामले’ हे नाटक सादर केले जाणार आहे.
चारही युनिटमध्ये विविध कार्यक्रम
बुधवारी (दि. १६) दुपारी २ वाजता कारंदवाडी युनिट तसेच तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. १७) दुपारी ४ वाजता कारंदवाडी युनिटमध्ये पुणे येथील प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे यांचे ‘जगणं सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शनिवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता कारंदवाडी युनिटमध्ये प्रा. ऋषिकेश खारगे, कुंडल यांचे व्याख्यान होईल. सोमवारी (दि. २१) दुपारी वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये लाईव्ह ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी (दि. २३) दुपारी ३ वाजता वाटेगाव-सुरुल युनिटमध्ये श्री. जयवंत आवटे, कुंडल यांचे कथाकथन होणार आहे. त्याच दिवशी तिप्पेहळळी-जत युनिटमध्ये दंगलकार नितीन चंदनशिवे यांचे ‘जगण्याच्या वाटेवरची शब्दयात्रा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तसेच कारखान्याच्या चारही युनिटवर सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री आमदार जयंत पाटील व राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक कार्तिक पाटील, डॉ. सौ. योजना शिंदे-पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे, डी. एम. पाटील, राजेंद्र चव्हाण, तानाजी खराडे, विकास पवार, मनोहर सन्मुख, प्रेमनाथ कमलाकर, महेश पाटील, विश्वनाथ पाटसुते, संजय सत्रे, संदीप घनवट यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमांचे संयोजन करीत आहेत.










