आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी, जिल्हा प्रशासनाचा इशारा ; Pressure Mids, CO₂ Canisters वरही बंदी
कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका व अन्य कार्यक्रमांमध्ये Pressure Mids आणि CO₂ Canisters गॅस तसेच लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (१) अन्वये हा आदेश जारी केला आहे.
जिल्ह्यात १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणात मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. काही मिरवणुकांमध्ये Pressure Mids व CO₂ Canisters चा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे.
या उपकरणांमुळे श्वसनसंस्था, हृदय, कान व डोळ्यांवर दुष्परिणाम होण्याबरोबरच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर गणेशमूर्ती आगमन, घरगुती गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक तसेच अन्य कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट शो अथवा लेझर लाईटचा वापर करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. लेझरचा थेट प्रकाश डोळ्यांवर पडल्यास डोळ्यांच्या पडद्याला व बुबुळाला इजा होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान लेझर लाईटमुळे भाविकांच्या डोळ्यांना इजा झाल्याचे निदर्शनास आले होते.
त्यामुळे १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका व कार्यक्रमांमध्ये Pressure Mids, CO₂ Canisters आणि लेझर लाईटचा वापर करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.










