साखरेची विक्री किंमत ५० रुपये करा; अन्यथा साखर उद्योग टिकणार नाही : मानसिंगराव नाईक

प्रेसमड व सांडपाण्यापासून दररोज १० टन सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारणार

शिराळा : केंद्र सरकारने साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो ५० रुपये केल्याशिवाय तसेच इथेनॉल, स्पिरीट आदी उपपदार्थांचे अस्थिर दर स्थिर केल्याशिवाय आर्थिक अडचणीतून वाटचाल करणारा साखर उद्योग टिकणार नाही, असे प्रतिपादन विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले. दरम्यान, प्रेसमड व सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रतिदिनी १० टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

चिखली (ता. शिराळा) येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात झाली. अध्यक्ष मानसिंगराव नाईक अध्यक्षस्थानावरून बोलत होते. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-सरूडकर व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक प्रमुख उपस्थित होते.

साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक अडचणींच्या संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना योग्य दर देण्यासाठी साखरेच्या विक्री दरात वाढ करणे आणि इथेनॉल, स्पिरीट आदी उपपदार्थांच्या किमती स्थिर ठेवणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र चार महिने उलटूनही अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

मानसिंगराव नाईक

अध्यक्ष

मानसिंगराव नाईक पुढे म्हणाले, गतवर्षी कारखाना केवळ १०० दिवस चालला. सध्या सर्वच साखर कारखाने आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. साखरेच्या दरात सातत्याने स्थिरता नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम होत आहे. साखरेच्या दरवाढीबाबत साखर कारखान्यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय सहकार मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यावेळी आठ दिवसांत साखर व इथेनॉलच्या आधारभूत किमतीत वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र चार महिने उलटूनही याबाबत निर्णय झालेला नाही.

कारखान्याने तब्बल ५ लाख ५० हजार क्विंटल साखर जुन्या दराने विकली. त्यानंतर साखरेच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली; मात्र ही दरवाढ अस्थिर ठरली. व्यापारी निविदा भरण्यास तयार नसल्याने साखर विक्रीत अडचणी निर्माण होत आहेत. कारखान्याने २० हजार क्विंटल साखरेची विक्री केली असली तरी व्यापाऱ्यांनी पैसे भरूनही साखर उचलली नसल्याने कारखान्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. आता पुन्हा साखरेचे दर खाली येत आहेत.

गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने साखरेच्या दरात अपेक्षित वाढ केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर देणे कारखान्यांसाठी कठीण होत आहे. साखरेचे दर वाढल्यानंतर सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेतला. मात्र या धोरणाचा फायदा उद्योजकांना होत असताना ग्रामीण भागातील बळीराजा आर्थिक अडचणीत सापडत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी सरकारने ठोस धोरणे राबविण्याची गरज असून, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांना अधिक बळकटी देण्यासाठी प्रेसमड व सांडपाण्यावर प्रक्रिया करून प्रतिदिन १० टन कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष नाईक यांनी दिली.

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली विश्वास कारखान्याने मोठी प्रगती साधली आहे. विविध उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प उभारून कारखान्याची आर्थिक वाटचाल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. साखर कारखानदारीसमोर अनेक अडचणी असतानाही ‘विश्वास’ कारखान्याची वाटचाल नियोजनपूर्वक सुरू ठेवण्यात आली आहे.

कारखान्याबरोबरच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणूनही मानसिंगराव नाईक आदर्शवत काम करीत आहेत. शेतकरी हिताच्या विविध योजना राबविताना ठेवी व कर्ज वितरणात वाढ करून पारदर्शकता जपली आहे. त्यांच्या पाठोपाठ कारखान्याचे संचालक असलेले युवा नेतृत्व विराज नाईक यांचेही काम उल्लेखनीय असल्याचे शिवाजीराव नाईक यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. संचालक विजयराव नलवडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी सभेपुढील विषयपत्रिकेचे वाचन केले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर व शंकांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालकांनी समाधानकारक उत्तरे दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी, फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, माजी संचालक रणजितसिंह नाईक यांच्यासह संचालक विराज नाईक, बाबासो पाटील, सुरेश पाटील, यशवंत निकम, विष्णू पाटील, शिवाजी पाटील, संभाजी पाटील, यशवंत दळवी, तुकाराम पाटील, ॲड. अजित पाटील, बाळासो पाटील, सुहास पाटील, बिरू आंबरे, संदीप तडाखे, सुरेश चव्हाण, आनंदा पाटील, सुकुमार पाटील, कामगार संचालक दत्तात्रय पाटील, कोंडिबा चौगुले यांच्यासह सभासद, खातेप्रमुख व विभागप्रमुख उपस्थित होते. आभार विश्वास पाटील यांनी मानले.

कर्जबुडव्यांना प्रोत्साहन देणारी धोरणे नकोत

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करताना आपण नेहमीच शेतकरी हिताचा विचार केला. थकबाकीदारांना सरसकट कर्जमाफी देण्यापेक्षा कर्जफेडीची शिस्त निर्माण करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या कर्जमाफीबाबत सरकार मेहेरबान राहते; मात्र कर्जबुडव्यांना प्रोत्साहन मिळेल अशी धोरणे राबवू नयेत, अशी स्पष्ट भूमिका अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी यावेळी मांडली.

 

आणखी वाचा

error: Content is protected !!