वाटेगाव : क्रांतिवीर देशभक्त दादा आप्पाजी बर्डे गुरुजी यांनी स्वातंत्र्यलढ्यात केलेला त्याग, शौर्य आणि संघर्षाची गाथा आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन दंगलकार प्रा. नितीन चंदनशिवे यांनी केले.
वाटेगाव येथे क्रांतिवीर दादा आप्पाजी बर्डे गुरुजी यांच्या ४४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. चंदनशिवे म्हणाले, बर्डे गुरुजींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी योगदान दिले. त्याचबरोबर पुढील पिढ्यांना विचारांची आणि शहाणपणाची दिशा देण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले.
अध्यक्षस्थानावरून गोवा मुक्ती स्वातंत्र्यसैनिक जिल्हाध्यक्ष रघुनाथ नार्वेकर म्हणाले, क्रांतिवीर बर्डे गुरुजी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भूमिगत राहून त्यांनी संघर्ष केला. अन्याय व गुंडगिरीविरुद्धही त्यांनी लढा दिला. त्यांच्या त्यागाचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतिवीर बर्डे गुरुजींच्या अर्धपुतळ्यास प्रा. नितीन चंदनशिवे व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डी. के. शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्क, सायबर, कोल्हापूरच्या पूनम माने यांच्या पथनाट्य पथकाने ‘नशामुक्ती’ विषयावर प्रभावी पथनाट्य सादर केले.
क्रांतिवीर बर्डे गुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर आधारित देशभक्तीपर रील स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेते कौस्तुभ ठोंबरे, बसवराज सुतार, श्रीधर खंडागळे, शुभम कांबळे आणि रोहित भोर यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांचा गौरव करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती रवींद्र बर्डे, विजयकुमार जोखे, प्रशांत बर्डे, शोभा बर्डे, पद्मश्री बर्डे, मोहन चव्हाण, हरिश्चंद्र औताडे, जयकर पाटील, हेमंत मुळीक, राहुल पाटील, धनाजी ठोंबरे, सुनील ढेबे, वसंत शिंगारे आदी उपस्थित होते.










