उरुण ईश्वरपूरात आ. जयंत पाटील यांच्या हस्ते स्ट्रीट लाईटचा शुभारंभ
ईश्वरपूर : उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या हद्दीतील पेठ-सांगली रस्ता आता स्ट्रीट लाईटमुळे प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळे उरुण ईश्वरपूर शहरातील नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रात्रीच्या वेळी सुरक्षित व सुखकर प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते वाळवा पंचायत समितीसमोर पेठ-सांगली रस्त्यावरील स्ट्रीट लाईटचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी उरुण ईश्वरपूरचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, गटनेत्या प्रा. अरुणादेवी पाटील, पाणीपुरवठा सभापती एल. एन. शहा, बांधकाम सभापती संदीप माने, आरोग्य सभापती डॉ. संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. जयंत पाटील यांनी वाळवा पंचायत समितीच्या आवारातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शंकरराव चव्हाण, उद्योजक सुरेंद्रदादा पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा व नगरसेविका पुष्पलता खरात, गणेश शेवाळे आदी उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, सांगली-पेठ रस्त्यावर स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने या मार्गावरील अंधार दूर झाला असून, नागरिकांची मोठी सोय झाली आहे. वाहतूक सुरळीत होण्यासह सुरक्षिततेच्या दृष्टीनेही या सुविधेचा फायदा होणार आहे. हा परिसरातील महत्त्वाचा मार्ग असून, येथे नागरिक व वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. आता स्ट्रीट लाईटमुळे हा मार्ग प्रकाशमय झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली-पेठ रस्त्याचे दर्जेदार व वेळेत काम पूर्ण झाले असून, त्यामुळे प्रवास सुखकर झाला आहे. आता स्ट्रीट लाईट सुरू झाल्याने शहरातील नागरिकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची आणखी चांगली सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या मार्गावर स्पीड ब्रेकर व सीसीटीव्हीची व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी नगरसेवक सुनील मलगुंडे, शिवाजी जाधव, जावेद इबुशे, स्वरूप मोरे, संग्राम पाटील, सचिन कोळी, शुभांगी शेळके, कांचन कोळेकर, मनीषा कुरळपकर, संध्या कांबळे यांच्यासह संजय पाटील, पिरअल्ली पुणेकर, रोझा किणीकर, मनीषा पेठकर, बाळासाहेब कोळेकर, शकील जमादार, दिग्विजय पाटील, परेश पाटील, आबिद मोमीन, अंगराज पाटील, जुबेर खाटीक, विजय जाधव, नगरपालिकेच्या वीज विभागाच्या अभियंता स्वप्नाली पाटील तसेच आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.










