संस्थेकडून कामगारांना आर्थिक पाठबळ : कार्तिक पाटील

राजारामबापू पाटील साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेकडून १३.२५ टक्के लाभांश जाहीर

ईश्वरपूर : राजारामबापू पाटील साखर कारखाना सेवकांची सहकारी पतसंस्थेने सातत्याने कामगारांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. भविष्यातही कामगारांच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहील, असा विश्वास राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष तथा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे यांनी सभेत १३.२५ टक्के लाभांश जाहीर केला.

राजारामनगर येथे संस्थेची ५६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष विजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेस वाळवा तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जनरल सेक्रेटरी तानाजी खराडे, कारखान्याचे सचिव डी. एम. पाटील, कामगार संचालक विकास पवार, मनोहर सन्मुख, संस्थेचे उपाध्यक्ष किरण बाबर आदी उपस्थित होते.

प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्तिक पाटील म्हणाले, माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील व राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था राज्यात आदर्शवत वाटचाल करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन संस्थेच्या माध्यमातून तत्पर कर्जपुरवठा केला जात आहे.

विजय मोरे म्हणाले, आर्थिक शिस्त, काटकसर आणि पारदर्शक कारभार ही संस्थेची वैशिष्ट्ये आहेत. संस्था अधिक सक्षम करण्यासाठी सभासदांनी राजारामबापू बाजारमधून जास्तीत जास्त मालाची खरेदी करावी.

प्रारंभी तानाजी खराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत काही सूचना मांडल्या. संस्थेचे सचिव शिरीष जोशी यांनी श्रद्धांजली ठराव मांडून विषयपत्रिकेचे व मागील इतिवृत्ताचे वाचन केले. उपाध्यक्ष किरण बाबर यांनी आभार मानले.

यावेळी चीफ अकाउंटंट संतोष खटावकर, कामगार कल्याण अधिकारी महेश पाटील, जलसिंचन अधिकारी जे. बी. पाटील, मुख्य वेळापाल संजय गुरव, रोखपाल संजय सत्रे, सुजित देशमुख, विकास अहिर, संचालक विजय पाटील, उज्वला भोई, भीमराव मचाले, धनंजय जाधव, संदीप गुरव, अमोल गावडे, अनिल जाधव, अशोक जामदार, गोविंद शिंदे, विठ्ठल नांगरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!