परदेशी पाहुण्यांना मुंबईच्या गणेशोत्सवाची भुरळ

आठ देशांच्या वाणिज्यदूतांनी घेतले बाप्पांचे दर्शन

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी फिनलंड, फ्रान्स, थायलंड, नॉर्वे, चीन, बेल्जियम, स्वीडन आणि इजिप्त या आठ देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांना भेट देत बाप्पांचे दर्शन घेतले.

माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माटुंगा येथील जी.एस.बी. गणपती, वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव, गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ तसेच गिरगावातील केशवजी नाईक चाळ येथील गणेशाचे दर्शन घेतले.

यावेळी परदेशी प्रतिनिधींना महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची ऐतिहासिक परंपरा, सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती देण्यात आली.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, सामाजिक एकता आणि लोकसहभागाचे प्रतीक असल्याचे सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा, इतिहास, लोकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत असल्याचे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय पर्यटकांना राज्याच्या सांस्कृतिक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी पर्यटन विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

आणखी वाचा

error: Content is protected !!