अवार्ड फॉर को ऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पुरस्कारासाठी निवड; २२ सप्टेंबरला राजधानीत होणार गौरव
ईश्वरपूर : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची दखल घेत राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय स्तरावरील ‘अवार्ड फॉर कोऑपरेटिव्ह सोशल रिस्पॉन्सिबिलिटी इन हाय रिकव्हरी एरिया’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशाची राजधानी दिल्ली येथे २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विशेष सोहळ्यात कारखान्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्ली यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भारत सरकारच्या मुख्य साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने राजारामबापू साखर कारखान्याची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी पत्राद्वारे कारखाना प्रशासनाला याबाबत कळविले आहे.
लोकनेते राजारामबापू पाटील यांनी वाळवा तालुक्यातील इंच न् इंच जमीन सिंचनाखाली आणण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या निधनानंतर हे कार्य माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे नेण्यात आले. कारखान्याच्या माध्यमातून ३८ सहकारी पाणीपुरवठा संस्था उभारण्यात आल्या असून, वाळवा तालुक्यातील सिंचन व पाणीपुरवठा क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
राजारामबापू इंडोमेंट ट्रस्टच्या माध्यमातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोअरवेल करून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावोगावच्या पिण्याच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठीही आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. ऊस उत्पादक सभासदांच्या मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक हातभार लावण्याचे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रतिक पाटील यांच्या संकल्पनेतून आधुनिक कृषितंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आला आहे. ठिबक सिंचन, सच्छिद्र पाईप निचरा प्रणाली, शुद्ध बियाणे व रोपे पुरवठा अशा योजना ना नफा ना तोटा तत्त्वावर राबविण्यात येत आहेत. ड्रोनद्वारे औषध फवारणीसह अद्ययावत मल्टीस्पेक्ट्रम ड्रोनची सुविधाही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘राजारामबापू ऊस भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक सुविधा, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत. गेल्या चार ते पाच दशकांत सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची दखल घेत हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
हा पुरस्कार आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. आमच्या साखर कारखान्याने लोकनेत राजारामबापू पाटील यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत,माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शना खाली ऊस उत्पादक शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांना केंद्रबिंदू मानून जे काम केले हे,त्यांचे फलीत म्हणजे हा पुरस्कार आहे. यामध्ये कारखान्याचे संचालक,ऊस उत्पादक सभासद शेतकरी,अधिकारी व कामगारांचे योगदान मोलाचे आहे.
प्रतिक पाटील
चेअरमन
राजारामबापू सहकारी साखर कारखाना










