जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा
सातारा : सातारा शहरातील पोवई नाका येथील लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाचे उर्वरित काम वेगाने पूर्ण करून स्मारकाचे लोकार्पण लवकरात लवकर करण्याच्या सूचना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी अधिकाऱ्यांना कामांच्या प्रगतीबाबत सूचना दिल्या. स्मारकाचे काम निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. कामात कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विकासकामे वेळेत, दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करणे, हा माझा स्पष्ट निर्धार आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासाला अधिक वेग देण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे.
पालकमंत्री ना. शंभूराज देसाई
प्रतापगड संवर्धनाच्या कामांना गती
ऐतिहासिक प्रतापगडावरील संवर्धन व विकासकामे येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री देसाई यांनी दिले. प्रतापगडाचा जाज्वल्य इतिहास पर्यटक आणि शिवप्रेमींना प्रभावीपणे समजावा, यासाठी तज्ज्ञ इतिहासकारांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पटकथा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.गडावर येणाऱ्या पर्यटकांसाठी ७० आसनक्षमतेचे सुसज्ज प्रेक्षागृह उभारण्यात यावे. संवर्धन, प्रेक्षागृह आणि इतर विकासकामांसाठी एकाच मुख्य एजन्सीची नियुक्ती करून कामांचा दर्जा आणि वेळेची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही त्यांनी सांगितले.प्रतापगडाचा इतिहास, महत्त्वाची माहिती आणि पर्यटकांसाठी उपलब्ध सुविधांचा समावेश असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हिडिओ क्लिप तयार करण्याच्या सूचनाही बांधकाम विभागाला देण्यात आल्या.
बोर्गेवाडीतील ८९ कुटुंबांच्या पुनर्वसनाला गती
बोर्गेवाडी (मेंढोशी), ता. पाटण येथील ८९ बाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाचाही पालकमंत्री देसाई यांनी आढावा घेतला. मौजे सडावाघापूर येथे उपलब्ध असलेली पुनर्वसनाची जागा अंतिम करून प्रत्येक बाधित कुटुंबाला किमान तीन गुंठे जागा मिळावी, यासाठी सकारात्मक प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे तातडीने पाठविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीनंतर करंजे नाका येथे उभारण्यात येणाऱ्या सैनिक संकुलाच्या जागेची पाहणी करून पालकमंत्री देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती घेतली.










