ईश्वरपूर-महादेवनगर येथे १०० केव्हीए ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण

राहुल महाडिक यांच्या हस्ते लोकार्पण

ईश्वरपूर : उरूण-ईश्वरपूर येथील महादेवनगर येथे १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला असून त्याचे लोकार्पण सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहुल महाडीक यांच्या हस्ते संपन्न झाले.

परिसरातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारे वीज खंडित होणे तसेच वाढत्या वीजभारामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता.परिसरातील नागरिकांनी नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी सातत्याने लावून धरली होती. विशेषतः उन्हाळ्यात आणि शेतीच्या हंगामात या समस्येची तीव्रता अधिक जाणवत होती. या पार्श्वभूमीवर या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून सुमारे ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात घरगुती तसेच व्यावसायिक वीज वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. जुन्या ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडत असल्याने कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार तांत्रिक बिघाडाच्या घटना घडत होत्या. त्यामुळे नागरिकांना तसेच शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन राहुल महाडिक, सुजित थोरात यांनी ना. चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत निधी मंजूर झाला आणि अल्पावधीतच नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला.

जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे ही लोकप्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी आहे. महादेवनगर परिसरातील वीज समस्येमुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत होता. पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या कामासाठी निधी उपलब्ध झाला आणि आज हा ट्रान्सफॉर्मर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. सुजित थोरात यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करून तो शासनाच्या स्तरावर पोहोचवला. त्यामुळे हे काम लवकर पूर्ण होऊ शकले. विकासकामे ही केवळ घोषणा न राहता ती प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचली पाहिजेत, हा आमचा प्रयत्न आहे. पुढील काळातही परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.
राहुल महाडीक

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष केदार पाटील, नगरसेवक सचिन कोळेकर , दिलीप राजमाने, सुभाष राजमाने, विजय कबुरे, रवींद्र कोपर्डे, मोहनराव पाटील, हेमंत पाटील, नागेश बोगाणे, सतीश गायकवाड, विषय कार्यकारी अधिकारी अमोल कांबळे, रमाकांत शिंदे, रविंद्र शिंदे, अर्जुन जावळे, दत्तात्रय माने साहेब, प्रशांत पाटील, धनंजय पाटील, सचिन वाडेकर, प्रमोद खुडे, महावितरणचे अधिकारी भंडारी साहेब, धीरज कबुरे, अक्षय पाटील, तोफिक मगदूम, सुशांत पाटील, सर्जेराव पाटील, धोंडीराम करे, महादेव करे, रत्नदीप करे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश

महादेवनगर परिसरातील वीज समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला. स्थानिक नागरिकांच्या मागणीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी नियमित समन्वय साधत निधी मंजुरीपासून ते काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा केला. त्यातून ५ लाख रुपयांच्या निधीतून १०० केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावणाऱ्या वीज समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा

error: Content is protected !!