कोल्हापूर : गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि विधायक पद्धतीने साजरा करण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने २३ ऑगस्ट रोजी रविवारी कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महाराष्ट्र शासनाने २०२५ मध्ये गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, यावर्षी राज्य महोत्सवांतर्गत आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशमूर्ती ही केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून कला, परंपरा आणि सर्जनशीलतेशी जोडलेली आहे. पर्यावरण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या हाताने शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती साकारावी, हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
मातीशी जोडणारा उपक्रम
डिजिटल युगात मोबाईल आणि स्क्रीनमध्ये व्यस्त असलेल्या हातांना मातीचा स्पर्श मिळावा आणि प्रत्येकाला आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती स्वतःच्या हातांनी साकारण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः तरुण पिढीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यास या कार्यशाळेची मदत होणार आहे.
कार्यशाळेसाठी ३०० रुपये प्रवेश शुल्क असून, सहभागी नागरिकांना मूर्ती तयार करण्यासाठी शाडूची माती व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी मर्यादित जागा उपलब्ध असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे.
यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या गणेशमूर्ती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मुंबई, नागपूर, कोल्हापूर आणि लातूर येथेही कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे.
पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी नागरिकांनी आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यातर्फे करण्यात आले आहे. नोंदणीसाठी संपर्क : प्रशांत जोशी – ७७२००८८८१४










