मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करा : विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

मुंबई : क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून जलद गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवन येथे सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाशी संबंधित आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाशी संबंधित १९ शिफारशी, तसेच सामाजिक न्याय विभागाशी संबंधित शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी आवश्यक निधीची तरतूद, योजनांना शासनाची मान्यता आणि संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधण्याबाबत अहिर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करताना अनावश्यक विलंब होऊ नये आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचावा, यासाठी जलद कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीस इतर मागासवर्गीय संचालनालयाच्या संचालक सोनाली मुळे, आर्टीच्या निबंधक इंदिरा अस्वार, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह संबंधित अधिकारी आणि मातंग समाजाचे प्रतिनिधी मारोती वाडेकर, नारायण गायकवाड, कैलास खंदारे, नामदेव साठे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!