ईश्वरपूर बसस्थानकाच्या पुनर्विकासासाठी परिवहन मंत्र्यांची सकारात्मक दखल

आमदार सदाभाऊ खोत यांचा पाठपुरावा

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील बसस्थानकाचा सुसज्ज, अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त असा पुनर्विकास करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या मागणीची सरनाईक यांनी सकारात्मक दखल घेत संबंधित विभागाला पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

ईश्वरपूर हे वाळवा तालुक्यातील प्रमुख शहर असून परिसरातील नागरिकांसाठी तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांसाठी येथील बसस्थानक महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. दररोज मोठ्या संख्येने नागरिक या बसस्थानकाचा वापर करतात. मात्र, सध्याच्या बसस्थानकात आवश्यक मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर बसस्थानकाचा सर्वंकष पुनर्विकास करून प्रशस्त प्रतीक्षालय, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सुसज्ज बस फलाट, पुरेशी आसनव्यवस्था, स्वच्छता व प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच आधुनिक सोयींनी युक्त मॉल उभारण्याची मागणीही करण्यात आली.

आमदार सदाभाऊ खोत यांच्या निवेदनाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ सकारात्मक दखल घेतली. ईश्वरपूर बसस्थानकाच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर करून त्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह संबंधित पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!