रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३२५ फूट लांबीचा तिरंगा आकर्षण
कराड : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत हर घर तिरंगा अभियानांतर्गत कराड शहराने गुरुवारी देशभक्तीचा अनोखा जागर अनुभवला. ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत निघालेल्या भव्य तिरंगा रॅलीत तब्बल १० हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले. हजारो हातांतील तिरंगे, देशभक्तीच्या घोषणा आणि रॅलीला मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कराड शहराचे रस्ते तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले.
या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरला तो ३२५ फूट लांब व १० फूट रुंद विशाल तिरंगा. विद्यार्थिनींनी हा तिरंगा हातात घेत शहरातून मार्गक्रमण केले. विशाल तिरंग्याचे दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती.

लाहोटी कन्या शाळेपासून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली. चावडी चौक, आझाद चौक, मुख्य बाजारपेठ मार्गे दत्त चौकात रॅलीची सांगता झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत उत्साह निर्माण केला. विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, व्यापारी, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.
कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, विक्रम पावसकर, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, कराडचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपीन मोरे, सहकार उपनिबंधक अपर्णा यादव, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. शहर व परिसरातील माजी सैनिकांनीही मोठ्या संख्येने रॅलीत सहभाग घेतला. देशसेवेत योगदान दिलेल्या या माजी सैनिकांचा संयोजकांच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
महापुरुषांच्या शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा लाभलेल्या या भूमीत राष्ट्रभक्तीची परंपरा आजही अभिमानाने जपली जात आहे. ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून राष्ट्रभावना प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक मनापर्यंत पोहोचत असल्याचे समाधान आहे. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना तसेच देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करणाऱ्या वीर जवानांना यावेळी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम, विकसित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प करूया.
आमदार डॉ. अतुल भोसले
कराडमधील ही तिरंगा रॅली प्रत्येकाच्या मनातील देशप्रेम अधिक बळकट करणारी ठरली आहे. नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.
आमदार मनोज घोरपडे
रॅली बाजारपेठेतून जात असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला. अनेक ठिकाणी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून तिरंगा रॅलीचे दृश्य पाहत होते. विद्यार्थ्यांच्या घोषणांमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.










