शेतकऱ्यांप्रमाणे पाणीपुरवठा संस्थांनाही शासनाने वीज बिलमाफी द्यावी : आ. जयंत पाटील

उरुण विकास सोसायटीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

ईश्वरपूर : राज्य शासनाने ७ हॉर्सपॉवरपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे. त्याच धर्तीवर सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या सभासद शेतकऱ्यांचाही वीज वापर ७ हॉर्सपॉवरपेक्षा कमी असल्याने या संस्थांचेही वीज बिल माफ करावे, तसेच यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू असून, गरज पडल्यास न्यायालयातही दाद मागू, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले.

सहकारमहर्षी बळवंत बाबाजी पाटील उरुण विकास सोसायटीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. अर्चना अविनाश मोहिते होत्या.

.

आ. पाटील पुढे म्हणाले, पतसंस्था, बँका आणि विविध वित्तीय संस्थांचे जाळे विस्तारले असले तरी पूर्वी गावोगावी सेवा सोसायट्यांना मोठे महत्त्व होते. या संस्थांनी गावांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. उरुण विकास सोसायटीची नूतन इमारत सुबक व भव्य असून, संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. यावेळी त्यांनी स्व. अशोकदादा पाटील यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.

सौ. अर्चना मोहिते म्हणाल्या, सहकार म्हणजे एकमेकांच्या हातात हात घालून सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी काम करणे होय. सभासदांचा विश्वास आणि अध्यक्षांच्या मेहनतीमुळे संस्था यशस्वी वाटचाल करीत आहे.

नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांनी महेश पाटील यांनी सभासदांचा विश्वास संपादन करून संस्थेचे व सभासदांचे हित साधल्याचे सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष महेश पाटील म्हणाले, ब्रिटिश काळात हस्तक व सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यासाठी १९१४ मध्ये संस्थेची स्थापना झाली. तेव्हापासून संस्थेने शेतकऱ्यांना भक्कम आर्थिक आधार दिला आहे. १९७० मध्ये स्व. यशवंतराव चव्हाण, क्रांतिसिंह नाना पाटील आणि लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या जुन्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. आता आ. जयंत पाटील यांच्या हस्ते नूतन इमारतीचे उद्घाटन होत असल्याचा आनंद असल्याचे सांगितले.

यावेळी उल्हास पाटील, खराडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अरुणादेवी पाटील, प्रा. शामराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेविका सुप्रिया पाटील, माजी नगरसेवक विजय कुंभार, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आप्पासो पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजवर्धन सरनोबत, सचिव भास्करराव पाटील यांच्यासह संचालक, सभासद व मान्यवर उपस्थित होते.

 

आणखी वाचा

error: Content is protected !!