युद्धाने जखमा दिल्या; पण कोल्हापूरने दिलेल्या मायेने दोन देशांना कायमचे जोडून ठेवले

पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाची कोल्हापूर भेट

कोल्हापूर : युद्धाच्या धगधगत्या काळात मायभूमीपासून दूर झालेल्या हजारो पोलिश नागरिकांना कोल्हापूरच्या मातीत मायेची ऊब मिळाली. अनोळखी भूमीत आलेल्या त्या महिला, पुरुष आणि चिमुकल्यांना छत्रपती घराण्याने आणि कोल्हापूरच्या जनतेने केवळ आसरा दिला नाही, तर त्यांना आपले मानले. काळाच्या ओघात ही माणुसकीची कहाणी भारत-पोलंड मैत्रीचा भावनिक दुवा बनली. याच सुवर्ण आठवणींना उजाळा देत पोलंडच्या संसदीय शिष्टमंडळाने कोल्हापूरला भेट दिली.

पोलंड-भारत संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षा तथा पोलंडच्या संसद सदस्या किंगा गायेव्स्का यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी स्वागत केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडवर जर्मनी आणि सोव्हिएत युनियनने केलेल्या आक्रमणामुळे हजारो पोलिश नागरिकांना आपली मायभूमी सोडावी लागली. संकटांनी वेढलेल्या या कुटुंबांचा प्रवास सोव्हिएत युनियन, इराणमार्गे ब्रिटिश भारतापर्यंत पोहोचला. त्यावेळी भारताने त्यांच्याकडे केवळ निर्वासित म्हणून पाहिले नाही, तर माणूस म्हणून त्यांना सन्मान, सुरक्षितता आणि आपलेपणा दिला.

सुमारे पाच हजार पोलिश महिला, पुरुष आणि बालके कोल्हापूरच्या वळीवडे येथे आली. परक्या देशातून आलेल्या या कुटुंबांसाठी वळीवडेची मातीच पुढे त्यांच्या आयुष्यातील एका सुंदर आठवणीचा भाग बनली. छत्रपती घराण्याने आणि कोल्हापूरच्या जनतेने त्यांना आश्रय दिला. त्यांनी येथे आपली घरे उभी केली, मुलांना शिक्षण दिले, संस्कृती आणि परंपरा जपल्या आणि आयुष्याच्या कठीण वळणावर मिळालेल्या या माणुसकीच्या आधाराची आठवण आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली.

काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या; मात्र वळीवडे आणि पोलंडचे नाते तुटले नाही. उलट या नात्याने भारत आणि पोलंड यांच्यातील मैत्रीचा मजबूत सेतू निर्माण केला.

युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या ऐतिहासिक भावबंधाला आधुनिक भारत-पोलंड मैत्रीचे स्वरूप देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा यावेळी उल्लेख करण्यात आला. पोलंडला दिलेल्या त्यांच्या विविध भेटींमधून तीन पिढ्यांपासून जपलेले हे नाते आज दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय संबंधांपर्यंत पोहोचल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.

वळीवडेचा इतिहास आता जगासमोर येणार

वळीवडेचा इतिहास हा केवळ कोल्हापूर आणि पोलंडचा इतिहास नाही, तर अडचणीच्या काळात माणूस माणसासाठी उभा राहू शकतो, याची जगाला प्रेरणा देणारी कथा आहे, असे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी वळीवडे येथे जागतिक दर्जाचे मानवता, शांतता आणि मैत्रीचे संग्रहालय उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या संग्रहालयातून युद्धाच्या काळात निर्माण झालेली वेदना, त्यानंतर मिळालेली माणुसकीची साथ आणि त्यातून फुललेले भारत-पोलंडचे मैत्रीचे नाते पुढील पिढ्यांना अनुभवता येणार आहे.

या भेटीदरम्यान पोलंडच्या शिष्टमंडळाने प्रस्तावित संग्रहालयासाठी त्यांच्या संग्रहातील तत्कालीन काळातील ऐतिहासिक वस्तू आणि दुर्मिळ छायाचित्रे प्रदान केली. त्यामुळे वळीवडेच्या इतिहासाला जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी भारत-पोलंडचे संबंध हे केवळ राजनैतिक संबंध नसून मानवता, करुणा आणि मैत्रीच्या नात्याने जोडलेले असल्याचे सांगितले. ‘मानवतेच्या कठीण काळातही करुणा आणि सहानुभूतीचा विजय होतो,’ हा संदेश वळीवडेच्या इतिहासातून जगाला मिळतो, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास महापौर रूपाराणी निकम, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, संयोगिताराजे छत्रपती, मुंबई येथील पोलंडचे वाणिज्य दूत तोमास्क विएलगोमास यांच्यासह पोलंडचे प्रतिनिधी, अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!