भाकरे पाणंद, साखळी रस्ता व भूखंडांच्या वर्गबदलाबाबत मागण्या
ईश्वरपूर : शिराळा तालुक्यातील पाडळी, मांगले व रिळे येथील ग्रामस्थांच्या विविध समस्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी सोमवारी ईश्वरपूर येथील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची भेट घेतली. यावेळी संबंधित गावांतील नागरिकांच्या अडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली.
रिळे येथील नागरिकांच्या हितासाठी भाकरे पाणंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच पाडळी येथील साखळी रस्ता खुला करावा, तर मांगले येथील अल्पभूधारक नागरिकांचे भूखंड ‘ब’ वर्गातून ‘अ’ वर्गात करावेत, अशा प्रमुख मागण्या विराज नाईक यांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

ग्रामस्थांच्या दैनंदिन अडचणी आणि त्यांच्या हिताच्या दृष्टीने या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी नाईक यांनी केली. याबाबत प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी संबंधित गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते.










