शिवपुरीच्या जलजीवन मिशनसाठी १ कोटी १८ लाखांचा निधी मंजूर ; ग्रामस्थांकडून सत्कार
ईश्वरपूर : वाळवा तालुक्यातील शिवपुरी गावासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत १ कोटी १८ लाख १२ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भाजप सांगली जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडीक यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाल्याबद्दल शिवपुरी ग्रामस्थांच्या वतीने सम्राटबाबा महाडीक यांचा सत्कार करण्यात आला. या निधीमुळे गावातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
शिवपुरी गावाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे, हा या निधीमागील प्रमुख उद्देश आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि शुद्ध पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. विकासकामांसाठी शासनाच्या विविध योजनांचा निधी गावापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू. शिवपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा; गावाच्या विकासासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास आपण कटिबद्ध आहोत
सम्राट महाडीक
शिवपुरी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या या निधीमुळे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ गावांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवपुरीसाठी हा मोठा निधी मंजूर झाला आहे. गावातील विकासकामांना शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सम्राट बाबा महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी युवक नेते संग्राम गोइंगडे, सरपंच स्मिता पोवेकर, बाबुराव भक्ते, महेश पोचे, शशिकांत भत्ते , सूरज माने, माजी सरपंच अण्णासो कमाने, सूरज पोवेकर, भरत भक्ते, अरुण हुनुरगे, माजी उपसरपंच शशिकांत कमाने, प्रवीण भक्ते, महावीर भक्ते, देवानंद पोवेकर यांच्यासह शिवपुरी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










