राजारामबापू कारखान्यात गणेशोत्सवासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांची जय्यत तयारी

विविध स्पर्धा, करमणूक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे होणार आयोजन : उपाध्यक्ष विजय पाटील

ईश्वरपूर : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाची भरगच्च आणि दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा यंदाही कायम ठेवत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. माजी मंत्री आमदार जयंत पाटील आणि कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा, करमणूक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील यांनी व्यक्त केला.

राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, कामगार कल्याण व जिमखाना समितीच्या अध्यक्षा डॉ. योजना शिंदे-पाटील, प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे, कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण, सरचिटणीस तानाजी खराडे, कामगार संचालक विकास पवार, मनोहर सन्मुख, मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटसुते, खजिनदार संजय सत्रे-देशमुख आदी उपस्थित होते.

प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्तिक पाटील म्हणाले, सांस्कृतिक मंडळाचा राज्यात नावलौकिक आहे. प्रतीकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दर्जेदार कार्यक्रम कामगारांसाठी आयोजित केले जात आहेत. सर्वांनी गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रभारी कार्यकारी संचालक विजय मोरे म्हणाले, कामगारांना आपल्या सूचना व मते मांडता यावीत, यासाठी स्वतंत्र बैठक घेण्यात आली आहे. कामगारांनी मांडलेल्या सूचनांवर चर्चा करून योग्य निर्णय घेतले जातील. श्रीगणेश हा विघ्नहर्ता व संकटमोचक असून, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करूया.

यावेळी सदाशिव पाटील, निलेश साठे, महेश देवकर, अभय पाटील, सचिन कोकाटे, योगेश पवार यांच्यासह कामगारांनी विविध सूचना मांडल्या. सभेत सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.

प्रारंभी कामगार युनियनचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी श्रद्धांजली ठराव मांडून मागील इतिवृत्त व विषयपत्रिकेचे वाचन केले. खजिनदार संजय सत्रे-देशमुख यांनी जमा-खर्चाचा अहवाल सादर केला. कामगार युनियनचे सरचिटणीस तानाजी खराडे यांनी आभार मानले.

यावेळी प्रेमनाथ कमलाकर, संतोष खटावकर, महेश पाटील, अनिलकुमार पाटील, धनाजी लाड, जे. बी. पाटील, राजेंद्र पाटील, संजय गुरव, संभाजी खोत, विकास अहिर, जयकर फसाले, सुभाष भोसले यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

आणखी वाचा

error: Content is protected !!