जिल्हा परिषद स्थायी समिती सभा ; जनहिताच्या विविध प्रश्नांकडे समितीचे लक्ष वेधले
सांगली : जिल्हा परिषद स्थायी समितीची पाचवी सभा जिल्हा परिषद सभागृहात पार पडली. सभेत मागील बैठकीच्या इतिवृत्तास मंजुरी, शासन निर्णयांचे वाचन, विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी जनहिताच्या विविध प्रश्नांकडे समितीचे लक्ष वेधले.
जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी पुनर्वसन वसाहतींच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात यावी, असा ठराव मांडला. हा ठराव स्थायी समितीने मंजूर केला. येळापूर येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ‘शालेय परिवहन समित्या’ स्थापन करून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेवर नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी नाईक यांनी केली.
तसेच CRGS पोर्टल बंद असल्यामुळे जन्म-मृत्यू नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया ठप्प असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोर्टलची समस्या तातडीने दूर करून नोंदणी प्रक्रिया सुरळीत करण्या बरोबरच
जनआरोग्य समितीप्रमाणे पशुसुधार समितीलाही निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या सर्व विषयांवर प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी भूमिका विराज नाईक यांनी मांडली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विषय सभापती, सर्व गटविकास अधिकारी, समिती सदस्य तसेच विविध विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख उपस्थित होते.










