महागाईविरोधात राष्ट्रवादी महिला आघाडीचे उरुण-ईश्वरपुरात जोरदार आंदोलन

ईश्वरपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उरुण-ईश्वरपूर येथे वाढत्या महागाईविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘बस झाला महागाईचा मार, नको आता हुकूमशाही सरकार’ अशा घोषणा देत केंद्र व राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार सारिका रासकर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेच्या गटनेत्या अरुणादेवी पाटील, शहराध्यक्षा पुष्पलता खरात, माजी अध्यक्षा रोझा किणीकर, प्रदेश सदस्या कमल पाटील, पंचायत समिती सदस्या रुपाली सपाटे, जिल्हा उपाध्यक्षा अलका माने, जिल्हा प्रतिनिधी मालन वाकळे व सुनंदा साठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

सुस्मिता जाधव म्हणाल्या, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. भाजीपाला, धान्य, डाळी, खाद्यतेल, गॅस तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या दराचा सर्वाधिक फटका महिलांना बसत आहे. दिवसेंदिवस खर्च वाढत असल्याने घर चालवायचे कसे, असा प्रश्न महिलांसमोर निर्माण झाला आहे. पंतप्रधान सोने खरेदी करू नका, असे सांगतात; मग महिलांनी पितळेचे दागिने वापरायचे काय? काँग्रेसने ७० वर्षांत काय केले, असे विचारले जाते; मग गेल्या १४ वर्षांत काय दिवे लावले? तसेच ८० लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.

अरुणादेवी पाटील म्हणाल्या, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. उलट सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. सरकारने महिलांच्या स्वयंपाकघरावर थेट घाला घातला आहे. केवळ आश्वासने न देता सरकारने महागाई कमी करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी.

शहराध्यक्षा पुष्पलता खरात म्हणाल्या, भाजप सरकारने महिलांवर आंदोलन करण्याची वेळ आणली आहे. आम्हाला भाजपचे ‘अच्छे दिन’ नकोत. काँग्रेसच्या काळातील चांगले दिवस होते.यावेळी अलका माने, श्वेता साळुंखे यांनीही सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला.

आंदोलनात मनिषा पेठकर, योगिता माळी, सविता पाटील, सारिका पाटील, प्राजक्ता पाटील, पूजा जाधव, मयुरी पाटील, श्वेता साळुंखे, सानिका धुमाळ, साक्षी पाटील, सृष्टी पाटील, मुस्कान डांगे यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

आणखी वाचा

error: Content is protected !!