शिराळा : सवादेकरवाडीतील रेशन धारकांच्या सोयीसाठी स्वतंत्र रास्त भाव धान्य दुकान मंजूर करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांच्यासह सवादेकरावाडीतील नागरिकांनी तहसीलदरांकडे केली आहे.
याबाबत तहसीलदार शामला खोत-पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, सवादेकरवाडी (ता. शिराळा) येथील रेशन धारक लाभार्थ्यांना सध्या वाकुर्डे खुर्द (ता. शिराळा) येथून रेशन घ्यावे लागत आहे. सवादेकरवाडी ते वाकुर्डे खुर्द ये-जा करण्याचे अंतर सुमारे चार ते साडेचार किलोमीटर असल्याने नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठी गैरसोय होते. सवादेकरवाडीचा परिसर डोंगराळ असून बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक कुटुंबांतील तरुण रोजगारानिमित्त मुंबई व इतर शहरांत असल्याने महिला व वयोवृद्धांना रेशनसाठी लांबपर्यंत जावे लागत आहे. या अनुषंगाने सवादेकरवाडीतील नागरिकांची स्वतंत्र रेशन दुकानाची मागणी आहे. तरी नागरिकांची गैरसोय व सुरक्षितता लक्षात घेऊन या मागणीचा विचार करावा व तेथे स्वतंत्र रास्त भाव धान्य दुकान मंजूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, ही विनंती.
या प्रसंगी सवादेकरवाडी नागरिकांसह विराज नाईक यांनी याबाबत तहसीलदार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी वाकुर्डे खुर्दचे उपसरपंच सागर शिराळकर, आकाराम सवादकर, अतुल उर्फ धर्मेंद्र सवादकर, शिवाजी सवादकर, सचिन सवादकर, विलास सवादकर, विक्रम सवादकर, सचिन मेंढकर, अक्षय मेंढकर, शिवाजी खिलारे, रोहित माने, श्रीराज सवादकर आदी उपस्थित होते.










